Pratisparadhee (प्रतिस्पर्धी) : Kiran Nagarkar / Tr. Rekha Sabnis (किरण नगरकर / अनु. रेखा सबनीस)
‘प्रतिस्पर्धी’ हा किरण नगरकर यांच्या साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या ‘ cucold’ या कादंबरीचा रेखा सबनीस यांनी केलेला मराठी अनुवाद.
सोळाव्या शतकातील संत मीराबाई, तिचा पती राणा भोज यांच्या जीवनावरची ही कादंबरी. तो काळ जिवंत करत असतानाच मेवाडच्या राजघराण्यातील अंतर्गत कलह आणि हेवेदावे यांचेही चित्रण या कादंबरीत येते. परंतु मीराबाईचे कृष्णरंगी रंगून जाणे, तिच्या पतीचे तिच्यावरचे प्रेम आणि तिचे प्रेम मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. श्रीकृष्ण हा मीरेच्या प्रेमाचा विषय आहे तसाच तो तिच्या पतीच्या भक्तीचा विषय आहे. आपले श्रद्धास्थान असलेला श्रीकृष्णच आपल्या पत्नीचा प्रियकर असण्याचे दुर्दैव राणा भोज याच्या नशिबी आहे. गुजरात, दिल्ली, माळवा आणि मेवाडच्या सीमेवर येऊन थडकलेला मुघल बादशहा बाबर एवढ्या शत्रूंना एकहाती तोंड देत असतानाच भोजाला कौटुंबिक कलहालाही सामोरे जावे लागले. ज्या राणाला इतिहास विसरला आणि आख्यायिकांनी बदनाम केले त्या राणा भोजाला किरण नगरकर निव्वळ हाडामांसाचा बनवीत नाहीत तर त्याच्याकडे आणि इतिहासाकडे बघण्याचा वाचकांचा दृष्टिकोन पार बदलून टाकतात.
कादंबरी सोळाव्या शतकातली; परंतु तिची स्पंदने मात्र कालातीत. याचे कारण तिचे अनेक पैलू आणि मनुष्य स्वभावाचा नगरकरांनी अतिशय खोलवर घेतलेला शोध. राजकीय-नैतिक-सामाजिक संघर्ष, स्त्री-पुरुषांचे शारीरिक अथवा नैतिक संबंध, राजकीय महत्त्वाकांक्षा, हेवेदावे, युद्धे, जय-पराजय, भक्ती, धर्म आणि अनेक कला या सर्वांचाच आपल्या जीवनाशी असलेला संबंध दर्शवणारी ही कादंबरी आहे. नागरकरांची साधी, सरळ आणि तरीही जिवंत भाषा मनाची पकड घेणारी आहे आणि मुख्य म्हणजे कादंबरीची गतिमानता वाचकाला पूर्णपणे खिळवून ठेवते.
ISBN: 978-81-7185-956-6
Number of pages: 634
Language: Marathi
Year of Publication: Reprint 2017