Tretayugadhar Ram (त्रेतायुगधर राम) : Dhananjay Deshpande (धनंजय देशपांडे)
त्रेतायुगातील राम म्हणजे कुणासाठी महापुरुष, एक दिव्य व्यक्ती, देव तर कुणासाठी आणखी काही. परंतु या रामाचा जीवनपट आपल्यासमोर येतो तो इतिहास म्हणूनही आणि एक महाकाव्य म्हणूनही. त्रेतायुगातील रामाचे या इतिहास आणि महाकाव्य यांच्या सीमारेषेवरील सत्य अधोरेखित करण्याचा अतिशय सूक्ष्म अशा अभ्यासू वृत्तीने केलेला प्रयत्न म्हणजे ‘त्रेतायुगधर राम’ ही कादंबरी होय.
धनंजय देशपांडे लिखित ‘त्रेतायुगधर राम’ हे पॉप्युलर प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेले त्यांचे दुसरे पुस्तक. या अगोदर देशपांडे यांचे ‘वेदांतील विज्ञान’ हे पुस्तक २००१ साली पॉप्युलरने प्रकाशित केले होते.
वाल्मीकी रामायण हा एकमेव आधार असलेल्या या कादंबरीचे लेखन करताना लेखकाला जे काव्य वाटले, त्याचा त्याग आणि जे सत्य वाटले, त्याचा लेखकाने स्वीकार केला आहे. यात जनमानसांत रुजलेल्या रुळलेल्या रामायणातील सर्वश्रुत अशा ज्या काही गैरसमजुती आहेत, त्यांचे खंडन लेखकाने केले आहे. हे खंडन करताना लेखकाने त्या-त्या गोष्टींचा, तत्कालीन घटना-प्रसंग-परिस्थितीचा, पात्रांचे स्वभाव-विभाव व्यक्तिमत्त्व व त्यांच्या एकंदर पार्श्वभूमीचा, पात्रेतिहासाचा व त्यांच्यातील परस्परसंबंधांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे तथ्य आणि तार्किकता यांच्या समतोल आधारावर रामायणातील व्यवच्छेदक सत्य धनंजय देशपांडे यांनी ‘त्रेतायुगधर राम’मध्ये मांडले आहे.
नागपूर विश्वविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतलेल्या धनंजय देशपांडे यांनी वर्धा येथे तेवीस वर्षे वकिली केली आणि त्यानंतर नगर दिवाणी न्यायाधीश म्हणून तसेच मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केले. न्यायदानाच्या कामात प्रत्येक घटनेकडे सर्वांगीण परिप्रेक्ष्यातून पाहण्याची त्यांची चौकसता या कादंबरीतही आपल्याला प्रतीत होते.
ISBN: 978-81-969198-0-1
Number of pages: 448
Language: Marathi
Year of Publication: 2025