Satyagrah (सत्याग्रह) – Baban Minde (बबन मिंडे)
‘सत्याग्रह’ ही कादंबरी म्हणजे मुळशी सत्याग्रहाचा निव्वळ पंचनामा किंवा दस्तऐवज नव्हे. विकासाच्या बुलडोझरखाली किडा-मुंगीप्रमाणे चिरडल्या जाणाऱ्या हाडामांसाच्या माणसांना आपला समाज कसा वागवतो आणि शेवटी त्यांचा सत्याग्रहदेखील अयशस्वी होऊन त्यांची पूर्ण वाताहत कशी होते, त्याची ही प्रक्षोभक शोकांतिका आहे. आणि या शोकांतिकेतील दृष्ट ग्रह म्हणजे तुम्ही-आम्ही, आपली सरकारे, व्यापारी, उद्योजक आणि आधुनिकतेच्या झगमगाटात मौजमस्ती करणारे सारेच नागरिक. आधुनिक प्रगती आवश्यक आहे, हे खरे. पण मग कादंबरीचा नायक महादेव बोडके आणि त्यांच्यासारखी असंख्य निष्पाप कुटुंबे यांचा बळी देणे अपरिहार्य आहे काय? मावळातले शेतकरी म्हणजे शिवाजीच्या स्वराज्याच्या लढाईत आघाडीवर लढणारे मावळे. त्यांना सत्याग्रहाच्या मार्गावर नेणारे सेनापती बापट, महात्मा गांधी त्यांचा जीव आणि जमिनी तर वाचवू शकले नाहीत, पण मधला मार्ग काढून त्यांना निदान धरणाने निर्माण केलेल्या विजेचा वापर करता येईल, असे किमान प्रयत्न करायला काय हरकत होती? गांधींनी कंपनीला नुसतेच आवाहन केले आणि बापट तुरुंगात गेले. टाटा कंपनीने गांधींना हिंग लावूनही विचारले नाही.
मिंडे मावळातलेच असणार म्हणूनच त्यांच्या हातून हाडामांसाच्या माणसांशी समरसून सांगितलेली जिवंत आणि अस्सल शोकांतिका लिहिली गेली. शोकांतिकेची परिणाम सोसणे तेवढे सोपे नसते. कादंबरी जिवंत आहे, म्हणूनच प्रक्षुब्ध करणारी, हातांच्या मुठी वळविणारी आणि डोळ्यांत राग आणि दुःखमिश्रित अश्रू आणणारी आहे. आजच्या धरणग्रस्तांच्या आंदोलनांकडे अधिक मानवी करुणेतून बघायला लावणारी आहे. इतिहास म्हणून नव्हे तर एक कादंबरी म्हणून तर शाळांनी आणि विद्यापीठांंनी तरुणांना वाचायला द्यावीच. पण एक अंत्यत आवश्यक बौद्धिक म्हणूनही ती वाचणे अनिवार्य करावे.
ISBN: 978-81-7991-896-8
No. of pages: 238
Year of publication: 2007