वादळ माणसाळतंय : वसंत कानेटकर

80.00 Original price was: ₹80.00.64.00Current price is: ₹64.00.

Fiction

Category:

Vadal Mansaltay (वादळ माणसाळतंय) – Vasant Kanetkar (वसंत कानेटकर)

“श्री. बाबा आमटे यांच्यासारखे एक महान झंझावती व्यक्तिमत्त्व आणि श्री. वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या मणिकांचन योगातून ही नाट्यकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्ष्याप्रमाणेच वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील हे प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनीही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंद आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कोणतीही तडजोड न मानणाऱ्या एका ध्येयधुद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्ठरोग्याला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती.

हे नाटक चरित्रात्मक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे. बाबांच्या कर्तृत्वाचा समुद्र तीन अंकांत आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्रायः अशक्यच, ती लेखकाची प्रतिज्ञाच नाही; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तित्व घेऊन रंगभूमीवर प्रगट होतात. ‘भाई’ म्हणजे पूर्णतः बाबा नव्हेत. पण फुलांचे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पाहणाऱ्यांना, प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकऱ्यांशी झुंज देतच जगातल्या सर्व ‘बाबांना ‘आणि ‘भाईंना’ आपला मार्ग काढावा लागतो. बसन्तरावांचा ‘भाई’ म्हणजे एक साक्षात बादळ आहे. राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा एक सुभग अर्थ त्यांच्याकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो.”
– वि. वा. शिरवाडकर

ISBN: 978-81-7185-694-7

Number of pages: 110

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2012