Maze Vidyapeeth (माझे विद्यापीठ) – Narayan Surve (नारायण सुर्वे)
नारायण सुर्वे यांच्या कवितेचे वेगळेपण ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या त्यांच्या पहिल्या संग्रहापासूनच लक्षात येते. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत कवी कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झालेले नव्हे तर ते जीवन प्रत्यक्ष अनुभवणारे कवी आहेत… सुर्वे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूर्तिस्थाने शोधली नाहीत. त्यांची बरीचशी कविता लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी, नव्या आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहणारी आहे. सुर्वे यांच्या कवितेतले जग कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आहे. केवळ जगण्यासाठीच ज्यांना रोज संघर्ष करावा लागतो अशा माणसांचे जग हा सुर्वे यांच्या कवितेतील महत्त्वाचा भाग आहे. परंतु या जगाचे वास्तव दर्शन किंवा बाह्य वर्णन हेच सुर्वे यांच्या कवितेतील अनुभवाचे स्वरूप नाही, तर आधुनिक समाजजीवनातील वेदनेची चित्रे शब्दबद्ध करीत असतानाच त्यातील हळुवार मानवी भाव व भविष्याविषयीचा दणकट आशावाद व्यक्त करणारी सुर्वे यांची वृत्ती त्यांच्या कवितेला वेगळेपण बहाल करते. कष्टकऱ्यांच्या जगाशी सुर्वे एकरूप झाले असल्याने त्या जगाचे झळझळीत रूप, भविष्यकाळातील स्वप्नांचे आभास आणि कष्टकऱ्यांच्या जगातील मानवी भावांचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते हे खरे, परंतु कष्टकऱ्यांच्या जगाच्या आत्मिक समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या या कवीला या जगातील मानवी भावांविषयीच विलक्षण आत्मीयता आहे. माणसाविषयीचे कुतूहल, ममत्व हा सुर्वे यांच्या मनाचा वृत्तिविशेष आहे. भोवतालच्या गर्दीतील माणसांचे माणूसपण शोधण्याचा सुर्वे यांचा ध्यास आहे, जो त्यांच्या कविता वाचताना प्रत्ययास येतो.
ISBN: 978-81-7185-082-2
No. of Pages: 64
Year of Publication: 1966