Tokonoma (तोकोनोमा) – Prabhakar Padhye (प्रभाकर पाध्ये)
‘तोकोनोमा’ मधला जपान हा देश राहिला नसून एक स्वभावचित्र बनला आहे. त्या स्वभावचित्राचा आविष्कार त्याच्या अनेकविध प्रवृत्तींसकट निसर्ग, धर्म, पौर्वात्य प्रकृती, श्रद्धा, अंधश्रद्धा, पाश्चात्य सुधारणेचा पिंड, उदात्तता, बीभत्सता, प्रेम, शृंगार, क्रौर्य ह्या सर्वांसकट झाला आहे. माणसाचा स्वभाव जसा संगती-विसंगतींनी भरलेला असतो त्याप्रमाणे सारा जपानही आहे आणि तोच संगती-विसंगतींसह ह्या पुस्तकात रूपाला आला आहे.
प्रभाकर पाध्ये यांच्या मनात जपानचे स्थान त्या ‘तोकोनोमा’ सारखे आहे. सगळे देश पाहिले पण जपानने मनात हे स्थान निर्माण केले. जसे काय त्यांच्या मनाच्या भिंतीवर जपानचे मानचित्रच रेखाटले आहे. हे चित्र रेखाटताना विविध तन्हांनी कलात्मकतेचा आविष्कार झाला आहे. पाध्ये काय सांगू आणि किती सांगू अशा भावनेने ओथंबून आले आहेत. ह्या ओथंबलेल्या भावनेमुळे त्यांचे हे प्रवासवर्णन कधी लघुकथेचे रूप घेते तर कधी लघुनिबंधाचे. कधी पत्रकाराच्या डोळ्यांनी ते वेध घेऊ लागते तर कधी मानवाच्या विविध प्रवृत्तींच्या मुळाकडेच छेद घेत घेत जाण्याचा हट्ट करताना दिसते. संथ लयींचा अनुभव देता देतानाच द्रुत लय धारण करून सूक्ष्म निरीक्षणाची आवर्तने घेत फिरते. वर्णनाचा सोपा, पसरट, पाल्हाळिक मार्ग धरता धरतानाच सूक्ष्म, कठीण, आडवळणी निवेदनाच्या रस्त्याने जाऊ लागते. संवादी विसंवादी लयींचा फेर धरतानाच वाचकाच्या मनात ते काठोकाठ भरते.
— चंद्रकांत वर्तक
(‘प्रभाकर पाध्ये वाङ्मयदर्शन’ ह्या पुस्तकातून)
ISBN: 978-81-7185-027-3
Number of pages: 224
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2012