Sulochanechya Paulkhuna (सुलोचनेच्या पाऊलखुणा) – Na. Dho. Mahanor (ना. धों. महानोर)
प्रिय महानोर,
तुम्ही तुमच्या चाहत्यांचे कविवर्य, शेतकरी मित्रांचे कृषिमहर्षी, परिचितांचे नामदेवरावदादा, राजकारणात आमदार ना. धों. महानोर, खास मित्रांचे नाम्या — तरी मी तुम्हाला आधीपासून महानोर असेच आपुलकीने म्हणत आलो. १९७५ साली लैला आणि मी मुलांना घेऊन पळसखेड्याला आलो तेव्हापासून तुमचे कुटुंबवत्सल रूप डोळ्यांत भरले होते आणि सुलोचनावहिनींची माया हे तुमच्या कर्तृत्वाच्या केंद्रस्थानी आहे याची जाणीव झाली.
जवळजवळ सदुसष्ट वर्षे साथ दिल्यानंतर त्यांच्या आजारात तुमची झालेली सैरभैर मनःस्थिती, फोनवरून का होईना, मी अनुभवत होतो. तरी त्यांच्या जाण्याने तुम्ही एवढे उलथून पडाल याची कल्पना आली नव्ह्ती. तुम्ही तर कुंठित होऊन थिजून गेलात. तुमच्या सृजनशक्तीच्या बळावर तुम्ही यातून बाहेर पडावे असा आम्ही प्रयत्न करत होतो. वर्षानंतर का होईना तुमचा दीर्घकालीन मित्र चंद्रकांत हे जमवू शकला.
‘दाटून आलेल्या भावनांचा अचानक सहज उद्रेक,’ ही आंग्ल कवी वर्ड्सवर्थ यांनी केलेली कवितेची व्याख्या. त्यानुसार तुम्ही तुमच्या भावनांना शब्दरूप दिले. सुलोचनावहिनी जाहीरपणे फारशा न बोलणाऱ्या. पण तुम्हाला साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला तेव्हा स्नेहा शिनखेडे यांनी त्यांना बोलते केले. त्या मुलाखतीचा काही भाग ह्या पाऊलखुणांत उचितच ठरेल. ह्या छोटेखानी स्मरणांजलीला पूर्णत्व देण्यासाठी ज्या तुमच्या कवितांचा वहिनींशी खास संबंध आहे असे तुम्हाला वाटले त्यांचा गुच्छ दिला आहे. यात त्यांच्यामुळे स्फुरलेल्या, त्यांना उद्देशून लिहिलेल्या आणि त्यांना विशेष आवडलेल्या कविता सापडतील.
तुमचा
रामदास भटकळ
ISBN: 978-81-958324-9-1
Number of pages: 136
Year of Publication: 2023