Sakina (सकीना) – वसंत बापट (Vasant Bapat)
सकीना’ हा वसंत बापट यांचा चौथा कवितासंग्रह. बापटांच्या कवितेचा विकास या संग्रहात प्रकर्षाने जाणवतो. राजकीय किंवा कलाविषयक विचारप्रणालीच्या कुठल्याही साच्यात बापटांची कविता कधीच अडकून पडली नाही. कलावादी भूमिकेचा अतिरेक पत्करून तिने सामाजिक राजकीय जाणिवेला निषिद्ध मानले नाही आणि सामाजिक जाणिवेची आंधळी बांधीलकी स्वीकारून आपला कलात्मक दर्जाही ढळू दिला नाही. बापटांची कविता आपल्या अनुभवाशी, अंतः प्रेरणेशी सतत इमान राखीत आली आणि हेच तिच्या विकासाचे, सामर्थ्याचे खरे केंद्र ठरले.
भारताचे दर्शन बापटांनी डोळे भरून घेतले. भारताचा निसर्ग, चालीरीती, लोककला, वैज्ञानिक विकासाच्या दिशेने होत त्याची वाटचाल यांचे बापटांच्या संवेदनशील मनाने घेतलेले दर्शन त्यांच्या या कवितासंग्रहात ओतप्रोत भरून राहिले आहे. बहुविधतेतून व्यक्त होणारे भारतीय एकात्मतेचे हे दर्शन आधुनिक मराठी कवितेचे अभिमानास्पद वैशिष्ट्य ठरावे असेच आहे. हे दर्शन घडवीत असतानाच अन्याय आणि भ्रष्टाचार यांच्या भाराखाली पिचणाऱ्या सामान्य माणसाची तीव्र वेदनाही बापटांची कविता तितक्याच सामर्थ्याने, शब्दांची शस्त्रे करून व्यक्त करीत राहिली. याच वेळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रसील्या प्रेमकविताही बापट लिहीतच होते. बापटांच्या कवितेच्या कक्षा किती चैतन्यशील आणि व्यापक आहेत याचे प्रत्यंतर अनुभवाच्या या विविधतेतून येते. बापटांची शैली या विविध अनुभवाशी सतत संवादी राहते. खट्याळ शृंगार आणि गडद उदासी, आक्रमक उपरोध आणि जीवन-मूल्यांविषयीची उदात्त आस्था, विचारांचा साचेबंदपणा फोडून सौंदर्यशोध घेणारी मोकळी वृत्ती, निसर्गाचा विभ्रम व विलास यांच्या बरोबरच एकाकी करून सोडणारे त्याचे भयकारी दर्शन… हे सारे अनुभव व्यक्त करताना बापटांची शैली सतत नवी रूपे घेत राहते.
ISBN: 978-81-7185-184-3
Number of pages: 106
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 1975