Lokakatha’ 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा’ 78 आणि त्यविषयी सर्वकाही) – Ratnakar Matkari (रत्नाकर मतकरी)
‘लोककथा’७८’ हे बेचाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं नाटक त्यातला भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातला वेगळेपणा यांमुळे बरंच चर्चेत आलं. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आदिवासींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर आधारलेल्या या नाटकातलं रौद्रभीषण वास्तव आणि त्याचा मन हादरवून टाकणारा आविष्कार हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. या नाटकातला सामाजिक आशय आजही कायम आहे, किंबहुना तो अधिकच भीषण झालाय असं म्हणता येईल. त्यामुळेच हे नाटक आजही कालसुसंगत राहिलं आहे. म्हणूनच ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही’ हे पुस्तक प्रकाशित करायचा निर्णय पॉप्युलरने घेतला. गेल्या बेचाळीस वर्षांत या नाटकाशी संबंधित अनेक लेख, परीक्षणं, फोटो, जाहिराती, पत्रकं अशी महत्त्वाची कागदपत्रं प्रतिभा मतकरी यांनी जपून ठेवली होती. त्यांचं संपादन करून प्रतिभाताईंनी या पुस्तकाची जुळवाजुळव केली.
स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, ‘लोककथा ‘७८’ या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया वेळोवेळी व्यक्त केल्या होत्या. या नाटकावरचे मान्यवरांचे लेख, कलाकारांच्या प्रतिक्रिया, राजीव नाईक यांनी घेतलेली मतकरी यांची नाटकाशी संबंधित मुलाखत असा रंगभूमीच्या आणि सामाजिक जाणिवेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असलेला मजकूर या ग्रंथात समाविष्ट केला आहे. लेखांमधले नाटकाचे संदर्भ लक्षात यावे यासाठी ‘लोककथा’७८’ची मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे. छापील स्वरूपात उपलब्ध झालेल्या विविध प्रकारच्या साहित्याचा सचित्र कोलाज या ग्रंथाच्या निमित्ताने नाट्यप्रेमी रसिक अनुभवतील. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मांडणी सतीश भावसार यांनी केली आहे.
ISBN: 978-81-7991-967-5
No. of Pages: 284
Year of Publication: 2021