Mahatma Jotirao Phule
‘महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक’ ह्या चरित्र ग्रंथात धनंजय कीरांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव, साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडविले आहे. अवीट गोडीचा हा ग्रंथ सर्वांगसुंदर नि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडविणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. ह्या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकत्यांना मार्गदर्शक ठरेल.
धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे २३ एप्रिल १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात तेवीस वर्षे नोकरी करून त्यांनी १९६२ च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी ‘फ्री हिंदुस्तान’ ह्या इंग्रजी साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती त्या काळी खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रांत चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झालेली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पदवी देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे व नवनालंदा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली ‘विद्यावारिधि’ ही सन्मान्य पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. शिवाजी विद्यापीठानेही १९८० साली ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली आणि त्यांचा यथोचित गौरव केला.
ISBN: 978-81-7185-554-4
No. Of Pages: 392
Year Of Publication: 1968