Begam Barve (बेगम बर्वे) – Satish Aalekar (सतीश आळेकर)
‘बेगम बर्वे’ वैयक्तिक शारीर-मानस असोशीबद्दल, साकार न झालेल्या इच्छांबद्दल, चिरंतन अव्याहत वेदनांबद्दल, कोंडलेल्या लैंगिकतेबद्दल आहे; तसंच ते सामाजिक दडपणांबद्दल, शोषितांच्या अस्फुट आक्रोशांबद्दल, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवांबद्दल, आर्थिक दमनाबद्दलही आहे. हे अभिजाततेच्या अंगाने फुलणारं नाटक एक करुण लोकनाटक होऊन जातं.
‘महानिर्वाण’ बाह्य/सामजिक दडपणांबद्दल, पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेबद्दल. सनातन, कर्मठ, जाचक धर्मरूढींबद्दल, धर्माच्या सत्ताकारणाबद्दल, परिवर्तनशक्य अशा वर्तमानातील शाश्वत सामाजिकतेबद्दल आहे; तितकंच ते अंतर्गत मानसिक घुसमटीबद्दल, लैंगिक असमाधानाबद्दल, नागरी नियंत्रणाबद्दल. कदाचित अटळ अशा दुर्दैवी शाश्चत मानसिकतेबद्दलही आहे. हे लोकघाटणीच्या जवळ जाणारं, नाटक हळूहळू दाटपणे अभिजात बनतं.
ही दोन्ही नाटक हसण्याच्या मार्गाने कारुण्याच्या घामाला नेतात. व्यक्तीच्या सुखदु:खांबद्दल आणि समाजाच्या रचना व्यवस्थेबद्दल बोलतात. ही नाटक एकाच वेळी लोकरंगी व अभिजात होतात; धार्मिक, आर्थिक, लैंगिक राजकारण मांडतात आणि आर्तपणे काही पुकारतातही. ‘महानिर्वाण’मधे ‘आवा चालली पंढरपुरा’ म्हणताना भाऊरावांचे आणि ‘बेगम बर्वे मधे ‘दया छाया में निवारुनिया’ म्हणताना बर्वेचे एकल स्वर हृदयातून उमटतात आणि ह्या दोघांचेही उच फैलावलेले हात मात्र त्या वेळी समस्त लोकांनाच जणू साद घालतात. ही दोन्ही नाटक एकाच वेळी उत्कटपणे काव्यात्म व प्रच्छन्नपणे राजकीय होतात. महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ ही आळेकरी नाटकं श्रेष्ठ ठरतात.
राजीव नाईक
(आकरी कालावकाश’ मुक्त शब्द ऑक्टोबर नोव्हेंबर २०२२)
ISBN: 978-81-955127-8-2
No. Of Pages: 68
Year of Publication: 1979