Zad-Zimbad (झड-झिंबड) – Krushnat Khot (कृष्णात खोत)
मराठी कथा-कादंबरी-कवितेत पाऊस आजवर हळुवार होऊन वावरत आलेला आहे. तो कधी सखा असतो, कधी प्रियकर, कधी पोशिंदा, कधी आईच्या दुग्धासारखा संजीवक, नवनिर्माणक्षम असतो. कृष्णात खोत यांच्या ‘झडझिंबड’ कादंबरीत पाऊस मात्र वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतली एकमेव कादंबरी आहे. पावसाची विविध रूपे इथे सहजपणे विकसित होत जातात. शेतकरी आणि पाऊस, खेडे आणि पाऊस यांचे असणारे अनोखे नातेबंध या कादंबरीत उलगडत जातात.
झडीचा पाऊस येण्याआधी पावसाची आतुरतेने वाट पाहणारा गाव आणि झडीचा पाऊस सुरू झाल्यानंतर बेहाल झालेले गाव या कादंबरीत चित्रित झालेले आहे.
पाऊस आपला स्वभाव बदलतो आहे याचे कारण आपण अपरिचित केलेली सृष्टीची हानी हे या काठेपाठीमागचे गर्भित सूचन आहे. अपरिमित उर्जेची नासाडी, निसर्गावर केलेला अनन्वित अत्याचार यांमुळे पाऊसही आपले रूप बदलतो आणि सुरू होतो झड-संताप. या झडीत गाव, माणूस, शेती, वृक्षवल्ली, जलचर, पाळीव प्राणी हे सारेच हतबल, अगतिक होऊन जातात आणि त्यांची दाणादाण उडून जाते. पाण्याचे, पावसाचे आणि माणसाचे नवे ताणतणावात्मक, उदध्वस्ततेकडे झुकलेले नातेबंध ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते.
जागतिकीकरणानंतर बदलती अर्थव्यवस्था, बदलते नातेसंबंध या पार्श्वभूमीवर पावसाची झड लागल्यानंतर संकटात सापडलेल्या माणसाला लुटण्याची भावना होणे आणि तशा पद्धतीचा व्यवहार अस्तित्वात येणे हे बदलत्या कृषिजन संस्कृतीतील नवे आवर्तन, ताणतणाव ही कादंबरी अधोरेखित करते. पावसाने हाहाकार मांडल्यानंतर जीव गमावणारे, जीव वाचवण्यासाठी धडपडणारे, जगण्याची तीव्र आकांक्षा असणारे या सर्व परिस्थितीत कसे बदलतात, वर्तन करतात याचे सूचन कादंबरीच्या सर्व तपशिलातून कृष्णात खोत अतिशय समर्थपणे करतात.
महापुरातील चौमाळ पाण्यासारखी कृष्णात खोत यांची भाषा या कादंबरीत वाचणाऱ्याला खिळवून ठेवतेच पण त्याहीपेक्षा अधिक घन मानसिकतेतून द्रव मानसिकतेत आणून वादळी व्हायला भाग पाडते. हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे.
ISBN: 978-81-7185-553-7
No. of pages: 220
Year of publication: 2012