Chincheche Zaad / Sundara Ramaswamy / Marathi Translation: Sharmila Phadke
‘चिंचेचं झाड’ ही सुंदर रामस्वामी यांची तमिळमधून भाषांतरित झालेली आधुनिक अभिजात कादंबरी आहे. एका प्रदेशाचा सामायिक इतिहास, हरपण्याचं दुःख, निसर्गाविषयीचं आपुलकीचं नातं आणि एखाद्या पौराणिक दंतकथेमध्ये शोभेल असं गावातल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असणारं एक चिंचेचं झाड, याविषयीचं मन भारावून टाकणारं चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं. दक्षिण भारतातल्या एका लहानशा गावामधला मध्यवर्ती तिठा, माणसांच्या आणि वाहनांच्या रहदारीने गजबजलेला; तिथे हे चिंचेचं झाड डौलाने उभं होतं. जोवर ते जिवंत होतं तोवर त्या झाडाचा आब जराही कमी झाला नव्हता. पन्नास वर्षांहून अधिक काळ ते भोवतालच्या जगाचा एक सहृदय साक्षीदार होतं. तिथला आनंद, दुःख, हसणं, रडणं प्रत्येक क्षण त्याने पाहिला. सावली देताना कोणताही भेदभाव केला नाही. बैलगाडीच्या जमान्यापासून सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय बदलांनी गजबजून गेलेला गावाचा प्रवासही या झाडाने पाहिला. त्याच गावामधला दामोदर आसन; एक गूढ तत्त्वज्ञ, असंख्य आठवणींचा संग्राहक, कथाकथनात निपुण असणारा. ते चिंचेचं झाड आणि त्या संदर्भात त्याने प्रसवलेल्या सगळ्याच कहाण्या, पिढ्यान्पिढ्या लोकांना झपाटून टाकणाऱ्या रसाळ गोष्टींचा अखंड झरा त्याच्यापाशी होता. दामोदर आसनच्या कथांनी भुरळ घातलेल्या एका अनामिक निवेदकाच्या कटू-गोड आठवणींमधून उलगडणारी ‘चिंचेचे झाड’ ही कादंबरी स्थित्यंतर, भौतिक विकासातील तडजोडी, अविनाशी प्रतिष्ठा, संस्कृती आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या, तरीही स्मृतींमध्ये अखंड जिवंत राहिलेल्या एका प्रतीकाची वैश्विक कथा आहे.





