Rutuchakra
ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांच्या हालचाली, रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखादया शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड है या ललितनिबंधाचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभवांना सेंद्रिय रूप देण्याचे या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेच्या ठिकाणी आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी बढ़ाची हिरवी पाने, पारिजातकाच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू फुलांच्या पायघड्यावरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद हे सारे रूपरसगंधाचे लावण्यविभ्रमाचे जग दुर्गाबाईचे हे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलियांचे रहस्य दुर्गाबाईना उलगडले आहे याची साक्ष या निबंधसंग्रहात मिळते.
ISBN: 978-81-7185-731-9
No. Of Pages: 154
Year Of Publication: 2022