Sadanand Rege : Samagra Kavita / Sadanand Rege / Ed. Vasant Aabaji Dahake
सदानंद रेगे यांनी जागतिक वाङ्मयातील संदर्भ शोधले आणि स्वतःच्या रचनांमध्ये मुरवून टाकले, ते त्यात त्यांना अदृश्य हातांनी विणलेल्या अस्सल जीवनाच्या खुणा आढळल्या म्हणूनच. त्यांना जागतिक साहित्यातील विविध संदर्भ आपले वाटले आणि अस्सल वाङ्मयाची निर्मिती करणारे लेखक त्यांना स्वतःचे सोयरे वाटले. साहित्य-कला हा रेगे यांचा धर्म होता. या मातीत त्यांची नाळ पुरलेली असतानाच ते स्वतःच्या यहुदी रक्तस्रोताची गंगोत्री शोधताना दिसतात. (येथे यहुदी म्हटले आहे, ब्रिटिश, युरोपीय असे म्हटलेले नाही.) रेगे यांनी पाश्चात्त्य (म्हणजे केवळ इंग्लिश, ब्रिटिश नव्हे) आणि मराठी या दोन्ही परंपरा एकात्म केलेल्या आहेत.
रेग्यांच्या एकंदरीत कवितेचा विचार केला तर ती किती विविध स्वरूपाची आहे हे ध्यानात येते. ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘देवापुढचा दिवा’, ‘ब्रांकुशीचा पक्षी’, ‘वेड्या कविता’ या संग्रहानंतरही त्यांची पुष्कळ कविता नियतकालिकांतून विखुरलेली आढळते. ‘सदानंद रेगे : समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची असंग्रहित कविताही समाविष्ट केलेली आहे.
सदानंद रेगे यांची कविता मर्ढेकर-मुक्तिबोध-करंदीकर आणि कोलटकर-चित्रे यांना जोडणाऱ्या दुव्यासारखी आहे. परंतु दुवा असणे एवढेच तिचे कार्य नाही. ती स्वतःच्या शब्दकळेने, जीवनजाणिवेने संपन्न आहे. अनन्य आहे.
– वसंत आबाजी डहाके
(प्रस्तावनेतून)





