व्यामोह – प्रभा गणोरकर

225.00 Original price was: ₹225.00.180.00Current price is: ₹180.00.

Sold out

Out of stock

Category:

Vyamoha

कविता जगण्यातील सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या अनुभवांवर आधारित पाहिजे. तिचा गाभा भावात्मक आणि ज्ञानात्मकही पाहिजे. कविता अंतः प्रेरणेतून आली पाहिजे. कवितेने व्यक्तीकडून समष्टीकडे, खाजगीपणातून सार्वजनिकतेकडे, जगण्यातून जीवनाकडे जाताना विचार, चिंतन, आधिभौतिकता, तात्त्विकता यांचा आश्रय घेतला पाहिजे. कवितेने माणूस आणि अचेतन, माणूस आणि निसर्ग, माणूस आणि जीवसृष्टी, माणूस आणि माणूस यांच्यातील व्यामिश्र नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कवितेने भाषेच्या अंतःस्तराचा वेध घेतला पाहिजे. कवितेच्या भाषेने विस्मित केले पाहिजे. कवितेतील शब्द संघटन व रचना अकल्पनीय असली पाहिजे. कवितेतील सूचकतेने आणि संदिग्धतेने वाचकांच्या कल्पनाशक्तीला आवाहन केले पाहिजे. कवितेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास अनुमान करता येण्यासारखा असू नये. ही सर्व अस्सल कवितेची लक्षणे असतील तर प्रभा गणोरकरांच्या व्यामोह या संग्रहात यांतली बहुतेक लक्षणे विखुरलेली आहेत…

प्रभा गणोरकर यांची अगदी सुरुवातीपासूनची कविता निसर्ग, झाडे, पाने, फुले इत्यादींनी व्यापलेली होती. या संग्रहात त्याची जागा इतर प्रगल्भ गोष्टींनी घेतलेली आहे. जगण्याच्या जटील व्यापात तो भूतकाळात हरवलेला निसर्ग आणि मानवी आस्था व मुक्त जगणे यांच्या आठवणींनी व्याकूळ होते. मात्र या आठवणीत गतकातरता नाही, तर ती वर्तमानासाठीचा एक अपरिहार्य संदर्भबिंदू होते. जगण्याच्या प्रवासात स्त्री म्हणून वाट्याला येणारी दुःखे आणि पुरुषी पर्यावरणाने होणारी छिन्नमानसता या संग्रहात अधिक सहज व प्रभावी होते. या संग्रहातील सगळ्या कविता एका विशाल स्वगताचे रूप घेतात, कारण स्त्रियांचे यातनामय आयुष्य व्यक्त करण्यासाठी स्वगत हे जणू सगळ्यात योग्य असे माध्यम आहे. या कवितांचे वेगळेपण म्हणजे समकालीन कवितेत अभावानेच आढळून येणारे सखोल चिंतन व आत्मविश्लेषण आहे. यामुळेच ही कविता भावकवितेचा परीघ ओलांडून अधिक व्यापक व सार्वजनिक होते. इथे भाषाही विधानविद्ध न होता सूचक, संयत व सहज होते. समकालीन कवितेत हा संग्रह लक्षणीय ठरावा.

ISBN: 978-81-7185-461-5

No. of pages: 126

Year of Publication: 2015