Milis Banali Smart Phone / Fati Erdogan / Tr.: Aruna Shri. Dubhashi
फाती एर्दोगन लेखक, चित्रकार, संपादक, प्रकाशक असलेल्या फाती एर्दोगन यांचा जन्म १९५४ साली इझमीरमध्ये झाला. त्यांनी १९८० मध्ये माविबुलुट प्रकाशनाची स्थापना केली. १९९० ते २००० या दशकात त्यांनी ‘किरमिझी फारे’ (लाल उंदीर) या मुलांसाठी असलेल्या पहिल्या साहित्यिक मासिकाचं आणि ‘बिंबीइ किताब’ या पहिल्या बालसाहित्य संशोधन मासिकाचं संपादन केलं. इस्तंबूल युनिव्हर्सिटीमध्ये १९९२ ते २००२ या कालावधीत त्यांनी बालसाहित्य या विषयावर साहित्य विद्याशाखा, ग्रंथपाल विभाग इथे व्याख्यानं दिली आणि त्याच विभागात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. त्यांनी मुलांसाठी पुस्तकं लिहिली, मुलांच्या पुस्तकांमध्ये सुंदर चित्रं काढली, मुलांसाठी अनेक उत्तम पुस्तकांचे अनुवाद केले. अगदी ३ वर्षांच्या मुलांपासून ते १३-१४ वर्षांच्या मुलांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी त्यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे आणि तेवढ्याच पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.
‘कमहुरियत’ आणि ‘रेडिकल’ या वृत्तपत्रांमध्ये बालसाहित्य आणि मुलांसाठी असलेली पुस्तकं यांवर त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
___________________________________________________________________________
स्मार्ट फोन हे ज्यांच्या जीवनशैलीचा भाग बनले आहेत त्या नवीन पिढीची मिलिस ही प्रतिनिधी. ही मुलं जगाकडे जणू फोनच्या माध्यमातूनच बघतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हाताशी सतत फोन लागणाऱ्या मिलिसला एक वेगळाच अनुभव येतो. एक असा चमत्कार होतो की ती स्वतःच स्मार्ट फोन बनते. फोनरूपाने मिलिस जे जग बघते, ज्या माणसांना भेटते त्यांतून तिच्यात काही बदल घडतो का ? आपला फोन आणि आपण एवढ्या मर्यादित जगात वावरणारी मिलिस आणि स्वतःच फोन बनण्याचा अनुभव घेतलेली मिलिस यांच्यात काही फरक आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘मिलिस बनली स्मार्ट फोन’ हे पुस्तक वाचावंच; अगदी बाकी सगळ्या गोष्टी ‘म्यूट’ करून वाचावं.
सध्याच्या मुलांच्या जीवनाशी जुळणाऱ्या गोष्टीतून त्यांना चांगल्या विचारांकडे नेणाऱ्या फाती एर्दोगन यांच्या या अद्भुत कथेचा रसपूर्ण अनुवाद अरुणा श्री दुभाषी यांनी केला आहे.





