Na. Dho. Mahanor (ना. धों. महानोर) : Prarthana Dayaghana (प्रार्थना दयाघना)
ना. धों. महानोर यांचे ‘रानातल्या कविता’, ‘वही’, ‘पावसाळी कविता’ आणि ‘अजिंठा’ असे चार कवितासंग्रह आम्ही आतापर्यंत प्रकाशित केले आहेत.
‘प्रार्थना दयाघना’ ह्या त्यांच्या नव्या संग्रहात सहा मोठ्या कवितांचा समावेश केला आहे.
‘अजिंठा’ मधील कवितेचे वेगळेपण सोडल्यास महानोरांची कविता ही प्रामुख्याने निसर्गात रमणारी. निसर्गाची, राना शेताची, पाखरा-शिवारांची वेगवेगळी रूपे वर्णन करताना महानोरांचे शब्द उचंबळून येतात. गच्च भरलेल्या शेताचे सौंदर्य पाहून झालेला आनंद त्यांच्या कवितेतून दरवेळी प्रतिबिंबित झालेला दिसतो आणि मग ‘जोंधळ्याला चांदणे लगडून जावे’ किंवा ‘ज्वार उभार, गर्भार। हिरव्या पदराला जर। चालताना वारा घुसमटे अंगभर’ असे शब्द अगदी सहजपणे येतात.
पण ह्या संग्रहातल्या कविता या सर्वांहून वेगळ्या आहेत. निसर्गातल्या सौंदर्यानुभवाने बेहोश झालेले मन इथे भोवतालच्या परिस्थितीमुळे होरपळले आहे असे दिसेल. निसर्गाचा प्रकोप, ढासळलेली समाजव्यवस्था आणि ही परिस्थिती बदलू न शकणारे शासन यामुळे सर्वस्वी निराश झालेली त्यांची मनःस्थिती या कवितांमधून सतत व्यक्त होते. रानातल्या कवितांमधला हिरवा निसर्ग, नागमोडी पाऊलवाटा, निर्मळ प्रेम, शृंगार, हिरवं गोंदणं, तळ्यातले चांदणे हे सारे लोपून गेल्याचे दुःख त्यात आहे.
पण भोवतालचं हे सुंदर जग नष्ट होत असतानाही दूर समुद्रापलीकडे निर्माण होत असलेल्या सुंदर समृद्ध जगाचे कौतुकही त्यात आहे आणि ते सारे पुन्हा इथे, ह्या मातीत आणून रुजविण्याची इच्छा आहे, आकांक्षा आहे. म्हणूनच प्रार्थना आहे दयाघन आभाळाला, घरट्या घरट्यातल्या सुखसमाधानासाठी, अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी, नव्या युगाचा आरंभकरण्यासाठी आणि माणूस म्हणून उभे राहण्यासाठी.
ISBN : 978-81-7185-390-8
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 106
Year of Publication : 3rd Edition 2026





