Niwadak Gangadhar Gadgil (निवडक गंगाधर गाडगीळ) : Ed. Sudha Joshi (संपा. सुधा जोशी)
मराठी साहित्यक्षेत्रातील एक अर्थपूर्ण साहित्यिक घटना असे गंगाधर गाडगीळांच्या कथेबद्दल म्हणता येईल. १९४० नंतरच्या दशकात उदयाला आलेल्या या कथेने नव्या साहित्यिक युगधर्माचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले. ज्या नवकथेचे प्रवर्तन गाडगीळांनी केले तिच्यातून प्रकटलेल्या नव्या साहित्यिक जाणिवांचा संस्कार केवळ कथेवर नव्हे तर एकूणच मराठी साहित्यावर घडलेला दिसतो. गाडगीळांचे कथालेखन त्यांतील कलागुणांमुळे तर लक्षणीय आहेच, त्याचबरोबर ते बीजधर्मी स्वरूपाचे, परंपरेला ‘नव’विणारे असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्याही विशेष मोलाचे ठरते.
गाडगीळांच्या सुमारे साठ वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीतील तीनेकशे कथांमधून प्रस्तुत संग्रहातील अठरा कथांची निवड करण्यात आली आहे. कलापूर्णता, मौलिकता, प्रयोगशीलता, व वैविध्य या निकषांच्या आधारे निवडलेल्या कथांचे हे संकलन गाडग्लांच्या कथाविश्वाचे एक प्रातिनिधिक दर्शन घडवणारे आहे.
गाडगीळांच्या कथालेखनाचा चिकित्सक व रसग्राही वृत्तीने सर्वांगीण वेध घेणारा प्रस्तावनापर समीक्षालेख हे या संग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे. संपादिका डॉ. सुधा जोशी यांनी लिहिलेल्या या लेखात गाडगीळांच्या कथेतील नवतेचे, प्रयोगशीलतेचे आणि तिच्या कलात्मक श्रेयाचे मार्मिक विश्लेषण केलेले आढळेल.
ISBN: 978-81-7185-987-0
Number of pages: 248
Language: Marathi
Year of Publication: Reprint 2009