Etu Lokancha Desh (एटू लोकांचा देश) – Vinda Karandikar (विंदा करंदीकर)
विंदा करंदीकरांनी बालकविता प्रथम प्रकाशित झाली ती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी. ती तोपर्यंतच्या बालकवितेपेक्षा पूर्ण वेगळी, वेगळ्या काव्यजाणिवेतून लिहिलेली, नवीन होती. या कवितेने गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मुलांच्या मनावर मोहिनी घातली आहे. बालपणी या कवितांचा आनंद घेणारी मुलं आज मोठी होऊन आपल्या मुला-नातवंडांना तितक्याच आवडीने या कविता वाचून दाखवतात आणि आजची एकविसाव्या शतकातली मुलंही या कवितेच्या बालविश्वात रंगून जातात. हे घडलं कारण या कविता लिहिताना विंदा स्वतः मुलांहून मूल झाले. त्यांचं मन बालकाचं झालं बालकाला त्याच्या प्रतिभेच्या दृष्टीतून जग कसं दिसू शकेल हे त्यांनी ओळखलं आणि तेच जग त्यांनी आपल्या अद्भुतरम्य शैलीतून उभं केलं. म्हणूनच त्यांनी फक्त बालकविता लिहिली नाही तर या कवितांच्या रूपाने मराठीतली श्रेष्ठ कविता लिहिली असं म्हणता येईल. विंदा करंदीकरांची विद्वत्ता, सूक्ष्म अवलोकन, भाषाप्रभुत्व या साऱ्यांचं सामर्थ्य त्यांच्या बालकवितांतही एकवटलं आहे, पण या साऱ्यांनी त्यांच्या कवितेवर कधीच मात केली नाही. त्यांची समृद्ध काव्यजाणीव, त्यांचं भाषावैभव, युआनचे उत्तुंग कल्पनाशक्ती या सर्वांनी मुलांकरिता एक नवं, कोवळं, टवटवीत सोपेपण धारण केलं, आणि तेही आपला उच्च दर्जा न सोडता. त्यांच्या कवितेतले प्राणी, पक्षी, पऱ्या, ढग, पाऊस, चित्रविचित्र माणसं, भुतं मुलांना अगदी जवळची वाटतात. कारण ती त्यांच्या भोवतालच्या जगात वावरणाऱ्या माणसांसारखी दिसतात, वागतात. इतकंच काय, ही माणसं आणि प्राणी-पक्षीदेखील नेहमीपेक्षा अधिकच जवळची वाटतात. या कवितेत माकड छत्रीएवढी हॅट घालतो तर कोल्हा पुणेरी पगडी घालतो, माकडाच्या दुकानात सिंह खरेदीला जातो, उंट कुराण वाचतो. झुरळ रेडिओत शिरून गवई होऊन बाहेर येतं आणि त्याच्या गाण्याला उंदीर तबल्याची साथ करतो, प्रेक्षक असतं मांजर. अशा प्राण्यांच्या जगाबरोबरच या कवितांमध्ये पाऱ्यांचं सुंदर जग आहे, एटू लोकांचा अद्भुत देश आहे, पिशी मावशी आणि तिच्या भुतावळीचं भीतीदायक जग आहे, सर्कशीमधून पळून आलेल्या माकडाच्या गमतीजमती आहेत.
एकूण अकरा पुस्तकांमध्ये हे गमतीदार जग सामावलेलं आहे.
वसंत सरवटे, सुभाष अवचट, दत्तात्रय पाडेकर, रत्नाकर मतकरी, अशा मोठ्या चित्रकारांच्या कुंचल्यांनी हे जग अधिकच जिवंत झालं आहे.
ISBN: 978-81-7185-614-5
No. of Pages: 16
Year of Publication: 1963