Aswastha Mee, Ashant Mee (अस्वस्थ मी, अशांत मी) – Nirja (नीरजा)
बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे २००४ सालच्या ‘अनुष्टुभ’च्या दिवाळी अंकात नीरजाची ‘रत्नप्रभा जाधव वर्तमानपत्रातील बातमी होते तेव्हा’ अशा लांबलचक शीर्षकाची कथा वाचली आणि मी त्या कथेच्या प्रेमातच पडले. नीरजाशी तेव्हा परिचय नव्हता पण या लेखिकेचं लेखन आपण प्रकाशित केलंच पाहिजे, असं आतून जाणवत होतं. त्या जाणिवेतूनच मी नीरजाचा पत्ता शोधून तिला संग्रहाच्या प्रकाशनासंबंधी विचारणारं पत्र लिहिलं आणि नंतर एक-दीड वर्षांनी ‘ओल हरवलेली माती’ या संग्रहाचं प्रकाशन झालं. तेव्हा झालेल्या ओळखीचं रूपांतर लवकरच मैत्रीत झालं आणि नीरजाची पुढची पुस्तकं हक्कानं मागण्याची सोय झाली. खरंतर ‘ओल हरवलेली माती’पूर्वी तिचे तीन कवितासंग्रह आणि एक कथासंग्रह अशी चार पुस्तकं प्रकाशित झाली होती. पण तरीही ‘ओल हरवलेली माती’च्या प्रकाशनानंतर ती पॉप्युलर प्रकाशनाची झाली ती कायमचीच. गेल्या आठदहा वर्षांत ‘निरर्थकाचे पक्षी’ हा कवितासंग्रह आणि ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ हा कथासंग्रह अशी तिची दोन पुस्तकं पॉप्युलरने प्रकाशित केली आणि आता गेल्याच आठवड्यात ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ हा तिचा नवा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
नीरजाचा प्रवास हा कवितेकडून कथेकडे झाला आहे. तिच्या नावावर जरी तीन कथासंग्रह असले तरी रसिकांच्या मनात तिची प्रतिमा कवयित्रीचीच आहे. हाच धागा पकडून मराठीतल्या ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष यांनी नीरजाच्या कथेविषयी मांडलेला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो. त्या लिहितात,”नीरजाच्या कथा व कविता यांच्यात एक आंतरिक नातं आहे. स्त्रीने घेतलेल्या आत्मखुणेचा, आत्मरूपाचा शोध हे दोहोंतील प्रधान सूत्र आहे आणि तिने मुक्तीसाठी केलेला संघर्ष, या संघर्षात तिला आलेले यशापयश आणि या आशयसूत्रांची विविध स्वरूपी आवर्तने तिच्या दोन्ही आविष्कार-रूपांत आढळतात.” नीरजाची कथाकार आणि कवयित्री या दोन्ही ठिकाणी असलेली केंद्रवर्ती भूमिका तिच्याच एका कवितेतील काही ओळींमधून अधिक स्पष्ट होईल —
“आता उघडायलाच हवेत
सारे झरोके या घराचे
ओल्या मातीचा सुगंध
श्वासांत साठवताना”
“आता या खिडक्यांना पडदे लावून शोभिवंत
मी लपवणार नाही माझे जडावलेले श्वास, की झुगारणार नाही
पहाटवेड्या वाऱ्याचा
मोकळा ओला स्पर्श”
‘अस्वस्थ मी, अशांत मी’ या नव्या संग्रहातल्या कथांतून तिच्या जाणिवांच्या विस्तारलेल्या कक्षांचे दर्शन घडते आणि हृदयाच्या अंतरहृदयातून येणारी अस्वस्थता आणि अशांतता अत्यंत प्रगल्भपणे व्यक्त होते. अविनाश सप्रे यांनी म्हटल्याप्रमाणे, स्त्रीत्वातून सुरुवात करून माणूसपणाचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत आणि त्यामागे आत्मप्रामाण्य, आत्मभान, आत्मशोध, आत्मप्रत्यय, आत्मविश्वास आणि आत्मबळ देणाऱ्या मूल्यांचं भान कार्यरत आहे.
ISBN: 978-81-7991-904-0
No. of Pages: 217
Year of Publication: 2019