आपलं पॉप्युलर

जवळपास एक शतकापूर्वी म्हणजेच १९२४ साली गणेश रामराव भटकळ या तरुणाने सुरू केलेलं पॉप्युलर बुक डेपो हे छोटंसं दुकान अनेक अंगांनी वाढत-वाढत आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची मानली जाणारी प्रकाशन संस्था — पॉप्युलर प्रकाशन — म्हणून उभी आहे. 

पॉप्युलर बुक डेपोच्या इंग्रजी प्रकाशनाची सुरुवात १९२५ सालापासून वैद्यकीय पुस्तकांच्या प्रकाशनाने झाली. आणि काही वर्षांतच वैद्यक आणि समाजशास्त्र या विषयांतल्या पुस्तकांच्या प्रकाशांनमध्ये पॉप्युलरने आपला स्वतंत्र ठसा उमटवला. पुढील काळात इतरही अनेक लोकप्रिय विषयांवरची आणि मुलांसाठीची उत्तम पुस्तकं  पॉप्युलरने प्रकाशित केली. समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये, इतिहासकार डी. डी. कोसंबी, रोमिला थापर आणि राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांनी पॉप्युलरच्या शैक्षणिक प्रकाशनाचा पाय रचला त्याच वेळी संजीव कपूरसारख्या नामवंत लेखकांनी पॉप्युलरच्या लोकप्रिय इंग्रजी पुस्तकांचं दालन समृद्ध केलं. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, स्टार चॅनल, डिस्कव्हरी चॅनल, नॅशनल जिओग्राफिक चॅनल यांच्यासह मुलांसाठी तयार केलेली पुस्तकं  उत्तम प्रकाशनांचा नमुना म्हणता येतील अशी आहेत. 

पण प्रकाशनविश्वात पॉप्युलरला खऱ्या अर्थाने नावाजलं गेलं ते त्यांच्या मराठी प्रकाशनातील कार्यामुळे. १९५२ साली गंगाधर गाडगीळ यांचं ‘कबुतरे’ आणि अरविंद गोखले यांचं ‘कमळण’ ही दोन पुस्तकं प्रकाशित करून पॉप्युलरने मराठी प्रकाशनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर गेल्या अडुसष्ट वर्षांत पॉप्युलरने साहित्य चळवळीच्या विविध अंगांत सहभाग घेतला. स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळीत, विशेषत्वाने नवकथा, नवकविता, मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरच्या माध्यमातूनच वाचकांसमोर आले. नव्या लेखकांना, प्रयोगशील साहित्याला कायम अग्रक्रम देण्याचं एकमात्र धोरण स्वीकारून विविध साहित्यप्रकारांतील जवळपास दीड हजाराहून अधिक पुस्तकं पॉप्युलरने आजवर प्रकाशित केली आहेत. पुस्तकाच्या अंतरंगाबरोबरच बहिरंगामध्येही विलक्षण म्हणाव्या अशा कल्पनांचा स्वीकार पॉप्युलरने केला, रुळलेल्या वाटा सोडून नवे पायंडे पाडले आणि मराठी साहित्यातील समृद्धी वाचकांपर्यंत पोहोचवली. सातत्याने उत्तम साहित्याचं प्रकाशन करत असल्यामुळे पॉप्युलरच्या यादीतील बहुतेक पुस्तकं ही ‘गेल्या अर्धशतकातील मराठीतील उत्कृष्ट साहित्य’ म्हणून मान्यता मिळालेली आहेत. ललित साहित्याबरोबरच साहित्येतर क्षेत्रातही समीक्षा, संगीत, सामाजिक शास्त्र, इतिहास, संस्कृती अशा अनेक विषयांत पॉप्युलरने काही महत्त्वाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे. प्रौढ वाङ्मयाबरोबरच मुलांसाठीच्या काही मोजक्या परंतु उत्कृष्ट पुस्तकांचं प्रकाशन पॉप्युलरने केलं आहे. विंदा करंदीकरांच्या बालकविता, रत्नाकर मतकरींची नाटकं मराठी साहित्यातले मैलाचे दगड मानता येतील. 

राष्ट्रीय पातळीवरील अनेक मोठे पुरस्कार आणि सन्मान पॉप्युलरच्या लेखकांना आजवर मिळाले आहेत. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेल्या चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), कवी विंदा करंदीकर (गो. वि. करंदीकर) आणि कादंबरीकार, कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय विश्राम बेडेकर, मालतीबाई बेडेकर, विजय तेंडुलकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, वसंत कानेटकर, सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी, ना. धों. महानोर, ग्रेस, नारायण सुर्वे, किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचं नाव जोडलं गेलं आहे. मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे नंतरच्या पिढीतले अजित दळवी, प्रभा गणोरकर, प्रशांत दळवी, अशोक पाटोळे, जयंत पवार, मकरंद साठे, राजन गवस, सदानंद देशमुख यांच्यापासून ते नव्वदोत्तरी पिढीतले लेखक कृष्णात खोत, दासू वैद्य, सौमित्र, नीरजा, प्रफुल्ल शिलेदार, श्रीधर तिळवे, राही अनिल बर्वे, मनस्विनी लता रवींद्र, धर्मकीर्ती सुमंत अशा अनेकांशी पॉप्युलरचे नाते जुळले आहे. 

 

मराठी प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पॉप्युलर प्रकाशनाला महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ही मिळाला आहे.