G. A. : The Lost Paradise (जी. ए. : द लॉस्ट पॅराडाईज) – Mahesh Shetye (महेश शेट्ये)
जी. ए. कुलकर्णी हे चोखंदळ रसिक वाचकांवर मंत्रमोहिनी टाकणारे नाव आहे, त्याचबरोबर अनेक वाचकांसाठी त्यांचे लेखन म्हणजे एक अनाकलनीय ठिकाणाकडे नेणारी दुर्बोध, दुर्घट वाट आहे. श्री. महेश शेट्ये या जी. ए. प्रेमी वाचकाला ही स्थिती बदलावी असे वाटले. जी. एं. ची पत्रे, त्यांच्याविषयी वृत्तपत्रांत व नियतकालिकांत छापून आलेले लेख, आप्तमित्रांनी सांगितलेल्या आठवणी, परीक्षणे अशा नानाविध संदर्भांच्या मंथनातून लेखकाने हे नवनीत वाचकांच्या हाती ठेवले आहे. जी. एं. च्या कथा आतवर पोहोचल्या की त्या आपल्या अनुभवविश्वाला समृद्धतेचा एक नवीन आयाम दिल्याशिवाय राहत नाहीत. पण त्या समजण्यासाठी जाणिवांना संवेदनक्षम पदर आणि बहुवाचनतेने विकसित झालेली उमज आवश्यक आहे; आणि हा प्रवास प्रत्येकाने आपापला करायचा आहे. अशा प्रवासाला नव्यानेच निघालेल्या किंवा जुन्याच परंतु गोंधळलेल्या वाचकांसाठी हे उत्कृष्ट पुस्तक आहे. रुढार्थाने हे जी. ए. यांचे चरित्र नाही. त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे आप्तजनांशी असणारे भावानुबंध, विविध टप्प्यांवरील जगणे, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा विविधांगी सखोल अभ्यास आणि त्यायोगे एक सकस साहित्यिक म्हणून झालेला त्यांचा विकास, विविध विषयांवर त्यांचे चिंतन या सगळ्याचे नव्याने संकलन आणि संपादन करून एकाच खंडात समाविष्ट केलेले हे समग्र चरित्रात्मक पुस्तक आहे. बेल्जियम काचांच्या विविधरंगी आणि भिन्न आकारांच्या तुकड्यांनी बनलेल्या कलाकृतीप्रमाणे हा एक मनोहर आकृतिबंध आहे, हे जी. एं. च्याच पुस्तकांच्या नावांनी सजलेल्या अनुक्रमणिकेवरून लक्षात येईल. एखाद्या पर्वतशिखरावर असलेल्या गूढ तरीही आकर्षक मंदिराने सर्वांचे चित्त वेधून घ्यावे, परंतु निबीड अरण्यातून वरपर्यंत जाणारी वाट दिसत नसल्याने वाटसरूने नाउमेद होताच त्याच्या नजरेस पायèया पडाव्यात तसे हे पुस्तक जिज्ञासू वाचकांच्या हाती पडत आहे.
– जयश्री जंगले
ISBN: 978-81-969198-3-2
Number of pages: 322
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2024