Bharatiya Sahityashastra भारतीय साहित्यशास्त्र – Ganesh T. Deshpande गणेश त्र्यंबक देशपांडे
प्रा. देशपांडे यांनी ‘भारतीय साहित्यशास्त्र’ या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पूर्वार्धांत भरताचार्यांच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या ‘रसगंगाधरा’पर्यंतच्या; म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० पासून खिस्तोत्तर १७०० पर्यंत; सुमारे दोन हजार वर्षांच्या काळात साहित्यशास्त्राचा विकास कसकसा होत गेला हे त्या त्या कालखंडात होऊन गेलेल्या ग्रंथकारांच्या ग्रंथांतील विषयांचे चिकित्सक पद्धतीने पर्यालोचन करून दाखविले आहे. या विभागात अनेक ठिकाणी प्रा. देशपांडे यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा प्रत्यय येतो……
उत्तरार्धात शब्दार्थांचे स्वरूप, अभिधा, लक्षणा व व्यंजना या शक्ति, व्यंग्यार्थ किंवा ध्वनि, रसप्रक्रिया इत्यादी साहित्यशास्त्रातील विषयांचे विवेचन इतर ग्रंथास अनुसरून सविस्तर केले आहे. त्यांतील ‘रसप्रक्रिया’ हे प्रकरण या विभागाचा गाभा आहे. प्रा. देशपांडे यांनी अभिनवगुप्ताच्या ‘अभिनव भारती’ व ‘ध्वन्यालोकलोचन’ या टीकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सिद्धान्त व त्याने केलेली पूर्वाचार्यांच्या मतांची परीक्षणे अत्यंत विशद रीतीने विवेचिली आहेत. साहित्यशास्त्रांतील विविध विषयांचे विवरण करताना व्याकरण, पूर्वमीमांसा, न्याय इत्यादि शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञांचा व सिद्धान्तांचा उपयोग केला जातो. प्रा. देशपांडे यांनी त्या त्या स्थली त्या संज्ञांचे व सिद्धान्तांचे स्पष्टीकरण केले असल्याने त्या शास्त्रांशी परिचय नसलेल्यांसहि त्यांचे विषयप्रतिपादन सुबोध वाटेल असे झाले आहे…..
प्रा. देशपांडे यांची भाषा ओघवती, सुडौल व सुंदर आहे. त्यांनी विवेचिलेले विषय गंभीर आहेत, तथापि त्यांनी ते यावच्छक्य सुबोध केले आहेत.
– डॉ. वा. वि. मिराशी
ISBN: 978-81-7185-564-3
Number of pages: 452
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: Reprint 2024